राहाता : तालुक्यातील गणेशनगर येथून १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून, लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्याचा मृतदेह स्कोडाच्या डिकीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात टाकल्याची घटना उघडकीस आली. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी ६ संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
प्रतीक वसंत सदाफळ (१९) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे शनिवारी (दि. १२) रात्री ११ च्या सुमारास गणेशनगर येथील निर्मळ रुग्णालयासमोरून अपहरण करण्यात आले. त्याला संशयितांनी सिल्व्हर रंगाच्या स्कोडा गाडीच्या डिकीत टाकले. लोखंडी रॉडने मारहाण करून ठार मारण्यात आले. पुरावा नष्ट करण्यासाठी सिन्नर – शिर्डी महामार्गाच्या कडेला मुसळगाव शिवारात, वनीकरण नालीच्या पायथ्याशी टाकण्यात आले होते.
प्रशांत जनार्दन जाधव, अक्षय पगारे, चंदू तहकीक, ओमकार शैलेष रोहम, प्रवीण वाघमारे, सोनू पवार यांच्याबरोबर २ ते ३ महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यातूनच प्रतीकचे तरुणांनी अपहरण केले. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने वैजापूर पोलिसांकडे नोंदविली. दि. १३ एप्रिलच्या रात्री १२.१५ च्या सुमारास प्रशांत उर्फ बाबू जनार्दन जाधव याने माझ्या भावाच्या मोबाईलवरून व्हिडीओ कॉल केला व भावाच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते व तो मृतावस्थेत होता, अशी फिर्याद मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ याने सिन्नर एमआयडीसी पोलिसांकडे दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित प्रशांत उर्फ बाबू जनार्दन जाधव (रा. शिर्डी), अक्षय पगारे (रा. शिर्डी), चंदू तहकीत (रा. सावळी विहीर, राहाता), ओमकार शैलेश रोहम (रा. राहाता), प्रवीण वाघमारे (रा. कालिकानगर, शिर्डी) व सोनू पवार (रा. सावळी विहीर, राहाता) या सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर संशयित फरार झाले असून, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील संशयितांचा शोध घेत आहेत. शिर्डीत दुहेरी हत्याकांड, गावठी कट्टे सापडणे, हाणामाऱ्या, शिवीगाळ, अपहरण, खून असे प्रकार वाढले आहेत. अवैध धंदेही सुरू आहेत.