अलिबाग : सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी शिक्षण संघटनांच्या शिष्टमंडळाला दिली होती. मात्र तरीही रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर सेवा निवृत्त झालेल्या १६९ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक संघटन आणि टिईटी पात्र उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी पात्र शिक्षकांची तात्पुरता स्वरुपात नियुक्ती केली आहे. तात्पुरता स्वरुपात नियुक्ती केलेल्या शिक्षकांना तालुके नेमून दिले आहेत, संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हे शाळांमधील पटसंख्या व शिक्षक संख्या विचारात घेऊन संबंधित शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्ती देणार आहेत.
हेही वाचा : Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
या शिक्षकांना शून्य शिक्षीकी शाळा तसेच ज्या शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे व शिक्षक कमी अशा शाळांमंध्ये नेमणूक दिली जाणार आहे. विशेष म्हणजे १६९ शिक्षकांमधील १४५ शिक्षक रायगड जिल्ह्यातील असून, २४ शिक्षक जिल्ह्याबाहेरील आहेत. या निर्णयामुळे शिक्षक संघटनामध्ये नाराजीचा सूर आहे.
शासनाने ज्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा ( टेट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी ) गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांची तातडीने भरती करावी. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी बिंदू नामावली पुर्ण केलेली आहे. आज राज्यात किमान ३० हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रायगड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांची १ हाजर २५० पदे रिक्त आहेत. ही तातडीने भरावीत अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच कोकणात येणार; ‘असा’ असेल दौरा, जाणून घ्या सविस्तर!
कुठे झाली नियुक्ती
रायगड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये १६९ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्वात जास्त ३१ शिक्षकांच नियुक्ती महाड तालुक्यात करण्यात आली आहे. तर पेण २३, म्हसळा २५, माणगाव १२, रोहा २३, श्रीवर्धन २२, अलिबाग २०, मुरुड १, सुधागड ७, तळा २, पोलादपूर ३ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
“शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपये मानधनावर नेमणूक करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध करून द्यावी. सेवानिवृत्त शिक्षकांना आमची विनंती आहे की आज अनेक उच्च शिक्षित तरुण बेरोजगार आहेत, आपण मानधनावर पुन्हा नोकरी स्विकारू नये. तरुणांना प्राधान्य देण्यासाठी सहकार्य करावे. सेवानिवृत्त शिक्षकांन विषयी निश्चित आदर आहे मात्र जो मार्ग स्वीकारला आहे त्यास विरोध आहे.” – राजेश सुर्वे, राज्याध्यक्ष शिक्षक परिषद प्राथमिक विभाग