अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला. धरणे शंभर टक्के भरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. परंतु, फेब्रुवारी महिना उजाडे पर्यंतच धरणामधील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २८ धरणांत आता केवळ ६० टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा पुरवण्यासाठी नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
रायगडमधील पर्जन्यमान यंदा चांगले होते. जिल्हयात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलीमीटर इतका पाऊस बरसतो. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. लघुपाटबंधारे वि भागाच्या अखत्यारीत येणारया जिल्हयातील २८ धरणांत आता ५९.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षीही पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्याला बसणार आहेत. उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे असणार आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरूडमध्ये १, तळा १, रोहा १, पेण १, अलिबाग १, सुधागड ५, श्रीवर्धन ३, म्हसळा २, महाड ४, कर्जत २, खालापूर ३, पनवेल ३, उरण १ अशी १३ तालुक्यांत २८ लघुपाटबंधारे विभागाचे प्रकल्प आहेत. यामधून जिल्ह्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यातील या धरणांमध्ये ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. अनेक धरणे ही ३० ते ४० वर्षापूर्वी बांधण्यात आली आहेत. मातीने बांधण्यात आलेल्या या धरणांना गळती लागली आहे. मात्र, प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्ती कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गळतीमुळे पाणीसाठा कमी होत असून उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.
लघु पाटबंधारे विभागाच्या अत्याधित असणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्याचा विचार केला तर ढोकशेत (सुधागड), रानिवली (श्रीवर्धन), कोथुर्डे (महाड) या धरणांमध्ये केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे. कवळे, घोटवडे, उन्हेरे, (सुधागड), वरंध, खिंडवाडी, खैरे (महाड), सालोख (कर्जत). या धरणांमध्ये ५० टक्के पाणी संचय आहे. फणसाड (मुरुड), श्रीगाव (अलिबाग), कार्ले, कुडकी, (श्रीवर्धन), अवसरे (कर्जत), डोणवत (खालापूर), पुनाडे (उरण), बामणोली, उसरण (पनवेल), कोंडगाव (सुधागड) प्रकल्पातील पाणी स्थिती जरा चांगली असून या प्रकल्पांमध्ये ७० टक्के पाणीसाठा आहे. तर वावे (तळा), सुतारवाडी (रोहा), आंबेघर (पेण), पाभरे, संदेरी (म्हसळा), भिलवले, कलोते- मोकाशी (खालापूर), मोरबे (पनवेल) या धरणात ९० टक्के पाणीसाठा आहे.