अलिबाग : भाताच्या हमीभावात यंदा अत्यल्प वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत ११७ रुपये इतकी वाढ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. गतवर्षी भाताला २ हजार १८३ रुपये भाव देण्यात आला होता. यंदा २ हजार ३०० रुपये देण्यात आला आहे. गेल्या वर्षी असमाधानकारक पाऊस असतानाही रायगड जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख ५१ हजार क्विंटल भातपिकाची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भाताचा उतारा चांगला होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पिकामध्ये पाण्याची आर्द्रता कायम असल्याने काही दिवस पीक उन्हामध्ये सुकावे लागणार आहे. यानंतर रायगड जिल्ह्यात २८ भात खरेदी-विक्री केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी करून भात खरेदी सुरू केली जाणार आहे.
‘अ’ दर्जासाठी २० रुपयांचा बोनस
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रति क्विंटल दोन हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यात अ दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण २० रुपयांचा फरक असणार आहे. तसेच, या वर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कमदेखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. बोनसची रक्कमही अत्यल्प असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
आगाऊ ऑनलाइन नोंदणी
ज्या शेतकऱ्यांना भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर करायची आहे, त्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली आहे.
यंदा पीक जोमात आले आहे. त्यातून चांगला मोबदला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र २ हजार ३०० रुपयांचा हमीभाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
यंदा फक्त ११७ रुपयांचा वाढीव हमीभाव जाहीर झाला आहे. ही वाढ अत्यल्प आहे. शासनाने हमीभावबाबत फेरविचार करायला हवा.
विवेक पाटील, शेतकरी, अलिबाग
खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. काही दिवसांत जीआर निघेल त्यानुसार विक्रीसाठी पाठवलेल्या भाताची आर्द्रता किती असावी, वाहतूक, विक्री पद्धत याबाबत माहिती सहकारी संस्थांना देण्यात येईल. – के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी