अलिबाग: प्रादेशिक परिवहन विभागाने जुन्या नंबर प्लेट बदलून, एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचा फतवा काढला आहे. मात्र या नंबरप्लेट बसविण्यासाठी वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. नंबर प्लेट बसवणाऱ्या एजन्सीकडून वाहनचालकांची अडवणूक केली जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर नंबर प्लेट कव्हरचा वाढीव भुर्दंडही लादला जात आहे.
राज्यशासनाच्या परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनाच्या नंबर प्लेट बदलून त्याठिकाणी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याची सक्ती केली आहे. यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पण या नंबर प्लेट बदलण्यासाठी वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. चार चाकी वाहनांच्या नंबरप्लेट मिळवण्यासाठी महिन्याभराची प्रतिक्षा कालावधी आहे. यानंतर जेव्हा ठरवून दिलेल्या दिवशी वाहनधारक नंबर प्लेट बसविण्यासाठी वाहने नोंदणीकृत फिटमेंट सेंटरवर जात आहेत. तिथे त्यांना जुनी नंबर प्लेट आधी काढून आणा असे सांगितले जाते. जुनी नंबर प्लेट काढणे ही आमची जबाबदारी नाही असे सांगून वाहनचालकांना परत पाठवले जात आहे. या शिवाय एचएसआरपी नंबर प्लेट नाजूक असल्याने, नंबर प्लेट कव्हरचा वाढीव भुर्दंड आकारला जात आहे. दुचाकीसाठी दिडशे रुपये तर चारचाकीसाठी अडीचशे रुपयांची मागणी केली जात आहे. जुनी नंबर प्लेट फिटमेंट सेंटर कडून काढली जात नसली तरी ती बदलली असल्याचा फोटो मात्र वाहनधारकांकडून आवर्जून मागवून घेतला आहे.
आधीच इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात एचएसआरपी नंबर प्लेटचे दर जास्त असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. दुचाकीसाठी ४५० + जिएसटी, तर चारचाकी वाहनांसाठी ७५०+ जिएसटी अशी रक्कम आकारली जात आहे. त्यातच आता नंबर प्लेट कव्हर आणि जुनी नंबर प्लेट काढण्याचा वाढीव खर्च आकारला असल्याने, वाहन चालकांना भुर्दंड पडत आहे.
याबाबत पेणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रारी आल्या तर कारवाई करू असे सांगीतले. वाहनचालकांनी अशी अडवणूक होत असेल तर प्रादेशिक परिवहन विभागाकडे लेखी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.