अलिबाग: मागील आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्‍या पावसाने आज सकाळपासून रायगड जिल्‍ह्यात हजेरी लावली. आज संध्‍याकाळच्‍या सुमारास दक्षिण रायगडमध्‍ये जोरदार पाऊस झाला. किल्‍ले रायगड आणि निजामपूर परीसरात झालेल्‍या ढगफुटी सदृष्‍य पावसाने नागरीकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले होते.

संध्‍याकाळी चार वाजण्‍याच्‍या सुमारास महाड, माणगाव, पोलादपूर या तालुक्‍यांमध्‍ये जोरदार पावसाला सुरूवात झाली. ढगांचा गडगडाट आणि वीजांच्‍या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. किल्‍ले रायगडच्‍या परीसरातील जोर आणि जवळच्‍या गावांमध्‍ये ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्‍याने रस्‍त्‍यांना नदीनाल्‍यांचे स्‍वरूप आले होते. पाण्‍याचे जोरदार प्रवाह रत्‍यांवरून वहात होते. या पाण्‍याची उंची दीड फुटांपेक्षा अधिक होती. जोर गावात एक चारचा‍की गाडी पाण्‍यात अडकून पडली तर दुचाकी वाहून गेली. अचानक आलेल्‍या जोरदार पावसाने नागरीकांची अक्षरशः तारांबळ उडाली. निजामपूर भागालाही पावसाने झोडपून काढले. कोरडे पडलेले नदीनाले दुथडी भरून वाहू लागले. नाल्‍याचे पाणी रस्‍त्‍याच्‍या बरोबरीने वहात होते.

हेही वाचा : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेंच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आज पहाटेपासूनच जिल्‍ह्यात पावसाने हजेरी लावली. सकाळी उत्‍तरेतील अलिबाग, पेण परीसरात मध्‍यमस्‍वरूपाच्‍या पावसाच्‍या सरी बरसल्‍या. दुपारी मात्र या भागात पावसाने विश्रांती घेतली मात्र ऊन सावलीचा खेळ सुरू होता. जिल्‍हयात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. सप्‍अेंबरच्‍या पहिल्‍याच आठवडयात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती.