अलिबाग : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हयात २ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील संबंधित तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या पिक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रायगड श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.
जिल्ह्याचे रब्बी एकूण पेरणी क्षेत्र १४ हजार ०३५ हेक्टर असून यामध्ये हरभरा १ हजार ०७६ हेक्टर व मुग २ हजार ४६० हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. या पेरणी क्षेत्रानुसार सन २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हयात हरभरा पिक १ हजार २७५ हेक्टर व मुग ९६५ हेक्टर असे एकूण २ हजार २३० हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे. या पिक प्रात्यक्षिकाकरीता राष्ट्रीय बिज निगम लि. तसेच महाबीज यांच्या मार्फत हरभरा बियाणे ८९३ क्विंटल व मुग बियाणे १४५ क्विंटल असे कडधान्य बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेही वाचा : “काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न”, सुप्रिया सुळेंचं थेट मनोज जरांगेंना आवाहन, म्हणाल्या…
बियाणे पुरवठ्या बरोबरच प्रक्रियामध्ये रायझेबियम व पीएसबी, एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये-फेरोमन ट्रॅप्सल्यअर्स किटकनाशक, बुरशी नाशक, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये सुक्ष्म मुलद्रव्ये इ. निविष्ठांचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना या पिक प्रयोगात सहभाग नोंदवायचा आहे. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.