अलिबाग : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमित्ताने जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मटण, चिकन आणि मच्छी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मद्य विक्रीही बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अयोध्येत २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, मंदिर आणि तिर्थक्षेत्रांची साफसफाई करून तिथे रोषणाई केली जाणार आहे.
हेही वाचा : “मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घ्यावं, सरकार…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी २२ जानेवारीला मटण, चिकन, मच्छी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. अलिबाग तालुक्यातील चौल, नागाव ग्रामपंचायतींनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. तर कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीनेही अशाच स्वरूपाची जाहीर नोटीस काढली आहे, अशाच स्वरूपाची आवाहन पत्रके आता ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींनी जारी केली आहेत. श्री राम मंदिर उत्सवाच्या निमित्ताने, गावातील मांसाहारी हॉटेल्स, धाबे आणि चायनिजची दुकानेही बंद ठेवावीत, असे आवाहनही या पत्रकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी मांसाहार करणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.