अलिबाग : सदरक्षणाय खल निग्रणाय हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे. पण रायगड पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना याचा विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पोलीसांच्या मदतीने सराफांना दीड कोटी रुपयांना लुटल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेनी ही कारवाई केली असून, गुन्ह्यांतील एक पोलीस साथीदार फरार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वस्त दरात सोने देतो असे सांगून नागपूर आणि कामोठे येथील सराफांचे १ कोटी ५० लाख रूपये लुटणार्‍या पाचपैकी चार जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. विशेष म्‍हणजे या गुन्‍हयात पाच पैकी तीन आरोपी पोलीस कर्मचारी आहेत. समाधान पिंजारी, दीप गायकवाड, पोलीस अंमलदार समीर परशुराम महात्रे व विकी सुभाष साबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्‍यांचा पोलीस साथीदार सुर्यवंशी सध्‍या फरार आहे.

मुळचा सांगली जिल्ह्यातील आटपाटी येथील रहीवाशी असलेला समाधान पिंजारी (वय २०) याने त्‍याच्‍या मुळ गावातील सध्‍या नागपूर येथे सराफ व्‍यवसाय करणारा नामदेव हुलगे यांच्याशी संपर्क साधला. आपल्या ओळखीचा शंकर कुळे याच्याकडे ७ किलो सोने आहे. तो हे सोने कमी दराने विकणार आहे असे सांगितले. नामदेव हुलगे याने ही बाब कामोठे येथील त्यांचे नातेवाईक सराफ व्‍यावसायिक ओमकार वाकशे याला सांगितली. स्वस्त दराने मिळत असल्याने काही सोने खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ५ कोटी जमणार नाही जेवढे पैसे जमतील तेवढ्या पैशांचे सोने घेऊ असे हुलगे यांनी समाधानला कळवले. समाधान याने सांगितले की मी स्वतः १ कोटी रुपये जमवले आहेत. तुम्ही जास्तीत जास्त रक्कम घेऊन अलिबागला या असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे नामदेव हुलगे त्यांच्या दुकानात काम करणारे सहकारी नितीन पिंजारी याच्यासह ६५ लाख रुपये घेऊन कामोठे येथील ओमकार वाकशे यांच्याकडे आले. त्यादिवशी समाधान पिंजारी कामोठे येथे गेला. ओमकार वाकशे यांनी ८५ लाख रुपये जमा केले. नामदेव हुलगे व ओमकार वाकशे यांनी मिळून १ कोटी ५० लाख रुपये जमा केले. नंतर नामदेव हुलगे, समाधान पिंजारी, नितीन पिंजारी , नवनाथ पिंजारी हे सर्व १ कोटी ५० लाख रुपये घेऊन ओमकार वाकशे यांच्या गाडीतून अलिबागकडे निघाले. वाटेत त्यांनी गाडी बदलली.

ही गाडी अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरणाजवळ आली असता समाधान पिंजारी याने गाडी थांबवली. त्याने नामदेव हुलगे व त्यांच्या सहकार्‍यांना पुढे पोलीस चेकिंग चालू आहे. मी शंकर कुळे यास तिनविरा येथे बोलावतो असे सांगितले. त्यावेळी दीप गायकवाड याने गाडी पनवेलच्या दिशेने वळवून ठेवली. थोड्याच वेळात पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे, विकी सुभाष साबळे मोटारसायकल वरून तेथे आले. त्यावेळी गाडीत बसलेला समाधान पिंजारी याने नमदेव हुलगे व त्याचे सहकरी यांना पोलीस आले आहेत, गाडीतून उतरा असे सांगितले. त्यामुळे नामदेव व त्याचे सहकारी पेशाच्या बॅगा गाडीत ठेवून खाली उतरले.

पोलीस अंमलदार गाडी जवळ गेले. त्यांनी नमदेव हुलगे व त्याच्या सहकार्‍यांची तपासणी सुरु केली. गाडीजवळ गेले. तेव्हा दीप गायकवाडने गाडी सुरु करून पनवेलच्या दिशेन सुसाट पळवली. गाडीचा पाठलाग करून आरोपीला पकडून घेवून येतो असे सांगून पोलीस अंमलदार निघून गेले. समाधान याने नामदेव याना तो ज्या राजकीय नेत्याकडे मदतीसाठी गेला आहे त्याच्या घरी पोलिसांची धाड पडून तेथून सात किलो सोने व सहा कोटी रुपये जप्त केले आहेत. पोलीस तुम्हाला पकडतील तुम्ही मोबाईल बंद करून निघुन जा असे सांगितले. नामदेव व त्यांचे सहकारी कामोठे येथे निघून गेले.

५ फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार सूर्यवंशी याने त्याच्या मोबाईल वरून नामदेव यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला.परंतु मोबाईल बंद असल्यामुळे त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. तुम्ही २ कोटी रुपये घेऊन गेले आहात. तुम्ही ताबडतोब पोलीस ठाण्यात या. नाही आलात तर तुमच्या विरोधात गुन्हा नोंदवून तुम्हाला अटक करू अशी धमकी दिली. सूर्यवंशी याने केलेल्या कॉलमुले नामदेव व त्यांच्या सहकार्‍यांनी अलिबाग गाठले. पोलीस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट भेटून घडलेली घटना सांगितली.

त्यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यान बोलावून या घटनेचा तापस करण्यास सांगितले. याबाबात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथके नेमली. या पथकाने समाधान पिंजारी, दीप गायकवाड यांना अटक केली. त्यानंतर पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे व विकी साबळे यांना अटक केली. त्‍यांचा एक साथीदार फरार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थनिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, सहायक फौजदार संदीप पाटील, प्रसन्न जोशी, राजा पाटील, प्रसाद पाटील , हवालदार यशवंत झेमसे, प्रतिक सावंत , अमोल हंबीर, सचिन शेलार, सचिन वावेकर , जितेंद्र चव्हाण , विकास खैरनार, परेश म्हात्रे, अक्षय पाटील, रवी मेढे, राकेश म्हात्रे , महिला पोलीस हवालदार अर्चना पाटील, पोलीस शिपाई स्वामी गावंड , ईश्वर लांबोटे यांनी कारवाईत भाग घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad district police arrested four along with two police person who robbed bullion business for crore rupees asj