अलिबाग: भारतीय निवडणूक प्रक्रीयेची पहाणी आणि अभ्यास करण्यासाठी चार देशांतील आठ जणांचे शिष्टमंडळ रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणूक प्रक्रीयेचा ते आढावा घेणार आहेत. यात बांगलादेश, श्रीलंका, कझाकिस्तान आणि झिंब्बाव्वे या चार देशातील प्रतिनिधींचा समावेश आहे.
इंटरनॅशनल इलेक्शन व्हिझिटर्स प्रोग्राम अंतर्गत हे प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात बांग्लादेश मधील महंम्मद मोनिरुझ्झमन टी, जी एम शाहताबूद्दीन या दोन बांग्लादेश मधील निवडणूक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय कझाकिस्तान केंद्रीय निवडणूक आयोगातील नुरलान आब्दीरोव, आयबक झिकन, श्रीलंके निवडणूक आयोगाच्या सिलया हिलक्का पासिलिना आणि झिम्बाब्वे निवडणूक आयोगाच्या सिम्बराशे तोंगाई आणि न्यायमुर्ती प्रशिला चिगूम्बा यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.
हेही वाचा : “मला उद्ध्वस्त करण्यासाठी…”, ‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
चार देशातील आठ जणांचे हे शिष्टमंडळ दोन दिवस मतदान प्रक्रीयेतील विवीध टप्पे, प्रशासकीय तयारी, मतदान प्रक्रीया आणि मतदान यंत्रांची साठवणूक या सर्व घटकांची पहाणी करून अभ्यास करणार आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यानंतर हे पथक अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी मतदान यंत्रणा, मतदान केंद्राकडे रवाना होतांना झालेल्या प्रकीयेची माहिती घेतली. उद्या हे शिष्टमंडळ मतदारसंघातील विवीध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रीयेची माहिती घेणार आहेत.
हेही वाचा : दरडोई उत्पन्नात वाढ, आरोग्य स्थितीत सुधारणा
भारतीय निवडणुक आयोग आणि इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्यातील सामंजस्य आणि सहकार्य करारानुसार इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम राबविला जातो. यानुसार दर पंचवार्षिक निवडणूकांना परदेशातील निवडणूक यंत्रणा भारतात येऊन येथील निवडणूक प्रक्रीयेचा अभ्यास आणि पहाणी करत असतात. यानुसार मुंबई जवळ असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघाची त्यांनी पहाणीसाठी निवड केली आहे.