रायगड : विक एंड तसेच दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्याने पुन्हा घरी जाणाऱ्या लोकांच्या वाहनामुळे बोरघाटात अमृताजन ब्रिज ते खंडाळा एक्झिटपर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून धिम्या गतीने वाहतूक चालू आहे. तर अमृताजन ब्रिजच्या खाली पुणे ते मुंबई लेनची वाहतूक बंद करून ७ लेन वरून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. पुणे ते मुंबई वाहतूक खंडाळ्यापासून जुन्या मार्गाने सुरु केली आहे.
सलग सुट्ट्यांमुळे शनिवारी सकाळी मुंबई-पुणे दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा आणि अलिबाग, वडखळ महामार्गांवर वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. वाहतुक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तीन दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर मोठ्या संख्येनी बाहेर पडले. त्यामुळे शनिवारी सकाळ पासून वाहनांची संख्या अचानक वाढली होती. मुंबई पुणे दृतगती मार्गावर बोरघाटात अमृतांजन ब्रिज ते खंडाळा दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतुक काही काळ बंद करून मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वळविण्यात आली होती. तर दृतगती मार्गावर पुण्याकडे जाणारी वाहतुक मुंबईकडच्या मार्गिकेवर वळविण्यात आली होती. त्यामुळे बोरघाट परीसरात वाहतूक धिम्यागतीने सुरू होती.
हेही वाचा : “मंत्रीपदासाठी आता देवाला कौल लावायचाच बाकी राहिलाय”, कोण म्हणतंय जाणून घ्या
मुंबई गोवा महामार्गावर पेण ते वडखळ दरम्यान महामार्गाचे काम सुरू असल्याने, वाहतुकीचा वेग मंदावला होता. गोव्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गीकेच्या क्रॉक्रीटीकरणाचे काम सरू असल्याने या मार्गावरील वाहतुक गोव्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून सोडण्यात आली होती. त्यामुळे एकेरी वाहतुक सुरू असल्याने या पट्ट्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. अलिबागच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने शहाबाज ते पेझारी दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दहा मिनटांचे अंतर पार करण्यासाठी २५ मिनटांचा वेळ लागत होता. बेशिस्त वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने या समस्येत अधिकच भर पडत होता.