रायगड: कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर आली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. खेड दिवाणखवटी नातुवाडी बोगद्या नजिक माती आणि दगड रेल्वे रुळांवर आल्यामुळे मागील दीड तासांपासून येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. येथील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.
मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली. श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी तर सावंतवाडी दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी नजीक नातूवाडी बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवर दगड माती आल्याने वाहतूक बंद झाली असून परिणामी १२०५२ रत्नागिरी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आणि २२१२० मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस रत्नागिरी येथे थांबवण्यात आली आहे . १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दिवाणखवटी येथे थांबवण्यात आलेली आहे.