अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पार्श्वभूमीवर देशभरात तीर्थक्षेत्र आणि मंदिरांमध्ये २२ जानेवारीपर्यंत श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंदिरे आणि तिर्थक्षेत्रांची स्वच्छता करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. येवढेच नव्हे, तर या मंदिर आणि तिर्थक्षेत्र स्वच्छता मोहिमांवर लक्ष ठेवण्यासाठी १५ तालुक्यांसाठी १५ अधिकाऱ्यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच नाशिकच्या काळाराम मंदीराला भेट देऊन, मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली होती. यावेळी अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले होते. यानंतर १४ जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यभरात महास्वच्छता मोहीम राबविण्याचे सूचित केले होते. यानुसार आता १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मंदिरआणि तिर्थक्षेत्रांत ही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
हेही वाचा : “…हे पाहून प्रभू श्रीरामही स्मित करत असतील”, ठाकरे गटाचा मोदींना टोला; म्हणाले, “महान संस्कृतीचे डबके…!”
जिल्हा परिषदेतील सर्व खाते प्रमुख आणि सर्व गट विकास अधिकाऱ्यांना या महास्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ग्रामसेवक, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह, स्वयंसेवी संस्था, बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, तसेच स्थानिक नागरिकांना मंदीरांच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी करून घेण्याचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पातळीवर या स्वच्छता मोहींमांचे आयोजन करून त्याचे फोटो आणि माहिती दररोज सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या मोहीमेला व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
या मंदिरस्वच्छता मोहिमेची सुरूवात अलिबाग येथील रामनाथ मंदिरापासून करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी राम मंदिरस्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या आणि इतर कचऱ्याचे यावेळी संकलन करण्यात आले. स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेल्या मंदिरांवर रोषणाई आणि रांगोळ्या काढण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत गावागावात दवंडी देऊन स्वच्छता मोहीम राबवून, घरांसमोर रांगोळ्या काढण्याचे आणि गुढ्या उभारण्याचे आवाहन केले जाणार आहे.
हेही वाचा : राज्यात वाहन परवान्यासाठी १९ निकष!
“शासनाच्या निर्देशानुसार १६ ते २१ जानेवारी या कालावधीत, जिल्ह्यातील सर्व मंदीरे, तिर्थस्थळांवर महास्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. त्याचबरोबर शासकीय कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, समाजमंदिरांची स्वच्छता केली जाणार आहे.” – शुभांगी नाखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग रायगड</p>