अलिबाग : रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांची संथगती सुरूच आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना, १ हजार ४२२ मंजूर योजनांपैकी केवळ ३१० कामेच पूर्ण झाली आहेत. तर १ हजार ११२ गावे अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्रसरकारच्या माध्यमातून घरोघरी नळ पाणी पुरवठा यावा यासाठी जलजिवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ आणि शुध्द मुबलक पाणी पुरवठा घरोघरी व्हावा हा या योजनेमागचा मूळ उद्देश आहे. प्रतिमाणसी किमान ५५ लिटर पाणी नागरीकांना उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. डिसेंबर २३ अखेर या अभियानातील सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. पण ठेकेदारांची अकार्यक्षमता, तांत्रिक अडचणी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि स्थानिक राजकारण या कारणामुळे योजनेअंतर्गत मंजूर कामे रखडली असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : “…म्हणून मी त्याला कानशिलात मारली”, पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजपा आमदाराची पहिली प्रतिक्रिया
जल जिवन मिशन अभियान अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४२२ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ३१० योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून योजना संबधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. दरम्यान सुरूवातीपासूनच या योजनेतील कामांबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. योजनेची कामे देताना एकाच ठेकेदाराला २० ते २५ कामे देण्यात आली. ही कामे देताना त्यांची एवढी कामे करण्याची क्षमता आहे अथवा नाही हे देखील पाहीले गेले नाही. काही ठिकाणी कामे न करताच पैसे दिले गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर काही योजनांमध्ये जुन्याच योजनेतील पाईप लाईनचा वापर करून नवीन योजना राबविल्या जात असल्याची तक्रारी केल्या गेल्या. त्यामुळे या कामांची चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. यानंतर अकार्यक्षम ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ज्या ३१० योजना पूर्ण झाल्या, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली आहे. यामुळे श्रम व वेळ वाचत असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील महिला व्यक्त करीत आहेत. पण एक हजार गावांची कामे रखडली आहेत. तेथील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.
हेही वाचा : Flamingo City: नवी मुंबई फ्लेंमिंगो सिटी होतेय पण त्यामागचं कटू वास्तव माहितीये का?
अकार्यक्षम ठेकेदारांवर कारवाईचा बडगा….
जल जीवन मिशन अंतर्गत कार्यारंभ आदेश देऊनही एक वर्षांचा कालावधी उलटूनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी कारवाईचा बडगा उगारला. १४ ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळया यादीत टाकून, त्यांच्याकडून २६ कामे काढून घेण्यात आली आहेत. या २६ कामांची फेर निविदा प्रक्रिया केली आहे. याव्यतिरिक्त सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. पण तरीही निर्धारित वेळेत कामे पूर्ण करणे अशक्य आहे.
हेही वाचा : ‘बेरोजगारी, महागाई यावर ‘धर्म’ हे उत्तर…’, संजय राऊतांची भाजपावर टीका
निधीची कमतरता…..
जलजीवन योजनेच्या कामांसाठी १ हजार २०० कोटी पैकी आत्ता पर्यंत २०७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी ७० कोटींचा निधी मिळावा यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र हा निधी अद्यापही उपलब्ध न झाल्याने, झालेल्या कामांचे पैसे ठेकेदारांना कसे द्यायचे हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागासमोर उभा राहीला आहे.