अलिबाग : रायगड जिल्ह्यात बैलगाडी स्पर्धांसाठी परवानगी मिळवण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाही, प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन स्पर्धा आयोजनाची परवानगी आता घेता येणार आहे. जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनाला अटी आणि शर्तींवर परवानगी दिली आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनासाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करणे अभिप्रेत आहे. स्पर्धांच्या आयोजनासाठी आत्तापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागत होता. यामुळे आयोजकांना अलिबाग येथे येऊन कागदपत्र आणि अर्जांची पुर्तता करावी लागत होती. त्यामुळे आयोजकांची मोठी गैरसोय होत होती. जाचक नियम अटीं मधून सुटका करून घेण्यासाठी बेकायदेशीरपणे स्पर्धा आयोजित करण्याचे प्रमाणही वाढत होते.
हेही वाचा : त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या! देशाची वाटचाल आता संकल्पाकडून सिद्धीकडे: पंतप्रधान
हीबाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनाचे अधिकार स्थानिक प्रांताधिकारी यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रांताधिकारी कार्यालयात आता बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनाची परवानगी मिळू शकणार आहे. आयोजकांना त्यासाठी अलिबाग येथे यावे लागणार नाही बैलगाडी स्पर्धांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणाऱ्या अर्जांवर सात दिवसांत परवानगी दिली जात होती. पण अर्जदारास विहीत नमुन्यात अर्ज दाखल करणे, कागदपत्रांची पर्तता करणे, परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे, संबधित विभागांचे अहवाल प्राप्त करून घेणे यास बराच वेळ लागत होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयांकडे यासंदर्भातील अधिकार देण्याचे निश्चित करण्यात आले.