अलिबाग : पर्यटन विभागाच्या मार्फत अलिबाग तालुक्यातील किहिम येथे थोर पक्षी अभ्यासक सलीम अली यांच्या नावाने पक्षी अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंजुरी मिळून दोन वर्ष झाली तरी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पर्यटन वाढीला अधिक चालना देणे, वेगवेगळ्या पक्षांची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी किहीम येथील जून्या जिल्हा परिषद शाळेमध्ये देशाचे आद्य पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास व एन्व्हाॅयरमेंट एज्यूकेशन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या केंद्राचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आतापर्यंत ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामे रखडली आहेत.
डॉ. सलीम अली हे देशाचे आद्य पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. त्यांनी भारतातील पक्षांचा आढळ, त्यांच्या सवयी, विविध जाती, आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला होता. डॉ. सलीम अली यांनी अलिबाग तालुक्यांतील किहीम या ठिकाणी मुक्कामी असताना, सुगरण पक्षाच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. त्यावर त्यांनी बीएनएचएसच्या जर्नलमध्ये प्रदिर्घ शोध निबंध लिहीला होता. हा निबंध त्यांना पक्षी शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास जबाबदार ठरला. भारतात हौशी पक्षी निरीक्षक बनण्याची परंपरा सुरू झाली आहे . वेगवेगळ्या पक्षी अभयारण्यांना भेटी देण्याचा क्रेझ वाढत आहे.
हेही वाचा : नागपुरातील पुरात नुकसान झालेल्यांना फडणवीसांकडून मदतीची घोषणा; म्हणाले, “चिंतेची बाब एवढीच की…”
पक्षांबद्दल आकर्षण असलेल्या पक्षी प्रेमींबरोबर पर्यटन वाढीसाठी किहीम येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सलीम अली यांच्या नावाचे पक्षी सेंटर व एन्व्हायरमेंट एज्युकेशन सेंटर रायगड जिल्हा परिषद व वन विभाग यांच्यामार्फत उभे केले जाणार आहे . यासाठी किहीम गावातील जिल्हा परिषदेची शाळा २००७ पासून बंद आहे. या शाळेच्या दोन इमारती असून सात वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी तीन वर्ग खोल्या सुस्थितीत असून चार वर्ग खोल्या नादुरुस्त आहेत. या शाळेत संरक्षण भिंत नाही. या शाळेची जागा अंदाजे ३० गुंठे क्षेत्रामध्ये आहे. या ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.या सेंटरमुळे पक्ष्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांना करता येणार असून एक पर्यटन क्षेत्र म्हणून एक वेगळी ओळख या सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे या जागेत 2022 पासून केंद्राचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहीती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे . पण सध्या हे काम रखडले आहे.
हेही वाचा : “माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान
असे असणार पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र
पक्षी शास्त्रज्ञ सलीम अली यांच्या नावाचे पक्षी व एन्व्हायरमेंट एज्युकेशन सेंटर असणार आहे. या सेंटरमध्ये सलीम अली यांच्याविषयी माहिती असणारे केंद्र बांधले जाणार आहे. सलीम अली यांनी पक्षाविषयी लिहीलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय, देशातील वेगवेगळ्या जातीच्या तसेच कोकणातील वेगवेगळ्या पक्षांची माहिती पर्यटक व स्थानिकांना मिळावी. यासाठी डिजीटल माहिती केंद्र , पक्षांविषयी असलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांसाठी विक्री , हे सर्व डिजीटल स्वरुपाचे अद्ययावत असे केंद्र असणार आहेत . त्यामुळे उर्वरित कामे लवकर मार्गी लावावीत, आणि अभ्यास केंद्राचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी पक्षी अभ्यासक आणि पर्यावरण वाद्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा : रायगडात गौरी गणपतींना उत्साहात निरोप
केंद्र सहलीसाठी वरदान ठरणार
रायगड जिल्हा परिषद व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किहीम या ठिकाणी डॉ सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास केंद्र उभे केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या बंद शाळेच्या आवारात हा प्रकल्प असणार आहे . किहीम हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हजारो पर्यटक किहीम समुद्र किनारी फिरायला येतात. पक्षी अभ्यास केंद्रातून किहीममध्ये आणखी पर्यटनाला चालना मिळणार आहे. शाळांच्या अनेक सहली जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेर जातात. हे अभ्यास केंद्र शाळांच्या सहलींसाठी वरदान ठरणार आहे.