राजापूर : “ नियोजनमधून निधी देताना आमच्यावर अन्याय केला गेला. डोंगरी विकासमधूनही निधी दिला नाही. मात्र, आम्ही केेलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेतले जात आहे. एवढेच नव्हे तर, खोट्या आश्‍वासनांसह पत्र देवून लोकांची दिशाभूल करीत पक्षप्रवेश केले जात आहेत. अनेक चौकशा झाल्या मात्र, आपली शिवसेनेप्रती निष्ठा कायम आहे. माझे दैवत असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांप्रती निष्ठा असल्याने आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहीलात हाच माझा खर्‍या अर्थाने विजय आहे.” असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार डॉ. राजन साळवी यांनी केले. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना रत्नागिरी तालुक्यातील आरोग्य, रस्त्यांची दयनीय स्थिती असल्याचे सागंत अशीच स्थिती राजापूरमध्ये करायची आहे का ? ” असा सवालही उपस्थित केला.

राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यासपाठीवर त्यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार हुस्नबानू खलिफे, शिवसेनेचे नेते अजित यशवंतराव, जिल्हाप्रमुख विलास चाळके, कोल्हापूरचे नितिन बानगुडे पाटील, नेहा माने, महमंद रखांगी, राष्ट्रवादीचे आबा आडीवरेकर, पांडुरंग उपळकर, अनिल भोवड, कमलाकर कदम, महेश सप्रे यांच्यासह मोठ्यासंख्येने आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला साथ देवून भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

यावेळी पुढे बोलताना साळवी म्हणाले की, “पंधरा वर्षात विकासकामे करताना रस्ते, आरोग्य, देवस्थान आदींच्या समस्या सोडविल्या आहेत. त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली आहे. मी शिंदे गटात यावे म्हणून हरतर्‍हेचे प्रयत्न करण्यात आले. मी दाद देत नसल्याचे पाहून ईडीकडून चौकशी लावली. मात्र, चौकशीत माझ्याकडे केवळ माझी निष्ठा मिळाली. एकवेळ राजन साळवी जेलमध्ये जाईल मात्र कधीही आपली निष्ठा विकणार नाही.” यावेळी त्यांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्‍वासही व्यक्त केला. अजित यशवंतराव यांनी बोलताना २३ नोव्हेबर हा स्व.बाळासाहेब ठाकरेचा जन्मदिन आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार आमदार साळवी यांना भरघोस मतांनी निवडून देत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी श्रध्दांजली वाहूया असे आवाहन केले. तर, काँग्रेसच्या माजी आमदार सौ.खलिफे यांनी बोलताना आम्ही सुध्दा इच्छूक होतो. मात्र, आघाडीच्या धोरणानुसार हा मतदार संघ सेनेकडे गेला असल्याने आम्ही आघाडीचा धर्म पाळून साळवी यांना निवडूण आणणारच. साळवी यांचा यावेळचा विजय मंत्रीपदाचा असणार असल्याने सर्वांनी भरघोस मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Story img Loader