रत्नागिरी : कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असे कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाही. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

रत्नागिरीतील झाडगाव एमआयडीसीमध्ये टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्य केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, डॉ. कुणाल खेमनार यांच्या सह इतर मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रत्नागिरी मध्ये होत असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य संवर्धन केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे सोने होणार आहे. १९७ कोटी खर्च या कौशल्य केंद्रावर करण्यात येत आहे. त्यामध्ये १६५ कोटी टाटा उद्योग समूहाकडून मिळणार आहेत. जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. त्यामध्ये रत्नागिरीत रिलायन्सचा संरक्षण साहित्य विषयक प्रकल्प, रत्नागिरीत होणारे डोमेस्टिक विमानतळ तसेच क्रूज टर्मिनल लवकरच तयार होत आहे, असेही पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, मी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अनेक टीका व कौतुकही झाले. मात्र अशा अर्थसंकल्पात उद्योगांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, आज तंत्रज्ञानाची युग आहे. विद्यार्थ्याने स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. स्पर्धेच्या युगात तांत्रिक कौशल्य ज्ञानाची गरज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होणारे टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य संवर्धन केंद्र हे राज्यातील तिसरे केंद्र आहे. अशा प्रकारचे केंद्र शिर्डी, मराठवाडा या ठिकाणी लवकर सुरू करण्यात येणार आहेत. कौशल्य केंद्रांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येणार आहे. राज्यात ठिकठिकाणी लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात होणारे कौशल्य केंद्रामुळे सोने होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास न होणारे प्रकल्प कोकणात उभे राहणार आहेत. कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असा कोणताही प्रकल्प कोकणात येणार नसल्याची ग्वाही पवार यांनी दिली आहे.

या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी त्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्य सरकारकडे जिल्ह्यात टाटा कौशल्य संवर्धन केंद्र व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. गडचिरोली मध्ये पहिले कौशल्य संवर्धन केंद्र उभे राहिले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या केंद्राची भूमिपूजन करण्यात येत आहे, मात्र येत्या वर्षभरात ते पूर्ण करून त्याचे उद्घाटनही अजितदादांच्या हस्ते करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले रत्नागिरी पुढील काही वर्षात महाराष्ट्र सुंदर शहर म्हणून बघायला मिळेल. त्यातील विद्यार्थी परदेशात न जाता त्यांना रत्नागिरीतच कौशल्य प्राप्त करता येणार आहे. जरी राजकीय स्थित्यातरे झाली तरी अजितदादांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी निधी देण्याचे काम केले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व शासकीय इमारतींची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, रत्नागिरीचे रूप बदलण्याचे काम उदय सामंत यांनी केले आहे. रत्नागिरीतून होणारी स्थलांतरे रोखण्याचे काम ते करत आहेत. अनेक प्रदूषण विरहित प्रकल्प रत्नागिरीत येत आहेत. रत्नागिरीत सुरू होणाऱ्या कौशल्य संवर्धन केंद्रात सात हजार विद्यार्थी दरवर्षी शिकणार आहेत. उद्योग मंत्री सामंत यांनी रत्नागिरी बरोबर रायगड जिल्ह्यात देखील विविध उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत असेही सांगितले.