रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीक मि-या समोर एलइडी नौका लाईट लावलेल्या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. या नौकेवर ५ लाखांचा दंड अपेक्षित आहे. रत्नागिरी शहरानजीक मि-या किनाऱ्यासमोर येथील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी शिवराज अनंत चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रत्नागिरी गस्त घालत होते. या भागात नौका एलइडी लाईट लावून नौका असल्याचे गस्ती पथकास निदर्शनास आले. एलइडी नौका लाईट लावलेल्या स्थितित मि-या जलधी क्षेत्रात किना-यापासुन ८.७२ वाव अंतरावर उभी होती.
नौकेची तपासणी केली असता अनधिकृतरित्या एलईडी लाईट असल्याचे निदर्शनास आले. “अल-कासिम” व क्र. आयएन डी – एमएच – ४ – एमएम – ६१२७ ही नौका तबस्सम याहिया सोलकर, मु. २४३, मजगाव रोड, मराठी शाळे जवळ, कोकणनगर, रत्नागिरी यांच्या मालकीची आहे. या नौकेवर नौका तांडेलसह ३ खलाशी होते. मात्र कोणत्याही प्रकारची मासळी नौकेवर आढळून आलेली नाही. ही नौका जप्त करून मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली असून नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांचे कोर्टात ठेवण्यात येणार असून नौकेस महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत रुपये पाच लाख दंड अपेक्षित आहे.