रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या जिंदाल कंपनीच्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचविण्यात गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व स्थानिक व्यवसायिकांना यश आले. गणपतीपुळे येथे रविवारी सुट्टी असल्याने सायंकाळच्या सुमारास पर्यटकांची गर्दी झाली होती याच दरम्यान सायंकाळच्या सुमारास जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट मरीन (जिंदाल)कंपनीचे चार कर्मचारी सुट्टी असल्याने गणपतीपूळे फिरण्यासाठी आले होते. यावेळी तीन जण समुद्रात उतरले असता तिघांनीही समुद्रातील चाल पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न घेता खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते बुडाले. या तिन्ही तरुणांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न स्थानिक जीव रक्षक आणि समुद्र चौपाटीवरील व्यवसायिकांनी केला. मात्र त्यामध्ये मोब्बत आसिफ (वय ३५) राहणार वेस्ट बंगाल सध्या राहणार जयगड व प्रदीप कुमार (वय ३५) राहणार उडीसा सध्या जयगड या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर ठुकु डाकवा (वय ३०) राहणार उत्तराखंड सध्या जयगड याला वाचविण्यात जीव रक्षक व स्थानिक व्यवसायिकाना यश यश आले. त्यातील मोब्बत असिफ आणि प्रदीप कुमार यांना पाण्याबाहेर काढल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने नेण्यात आले .मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तर ठूकू डाकवा याच्यावर उपचार करून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा