रावेर या ठिकाणी रक्षा खडसेंना भाजपाने तिकिट दिलं आहे. ज्यादिवशी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये रावेरमधून रक्षा खडसेंना तिकिट दिलं आहे. त्याच दिवशी रात्री शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर आज पत्रकारांशी चर्चा करताना रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे असा सामना होणार का? याचं उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान मोदींबाबत बोलणं टाळलं
भाजपाला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील, या भाजपा नेत्यांच्या दाव्याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी बोलणे टाळले. खडसे म्हणाले की, कोणी किती काम केले ते मला माहिती नाही. पण महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष आहे. मला देशाचे काही माहिती नाही. पण महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीनला भाव नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. राज्यातील असुरक्षिता वाढत आहे, अशी व्यापक टीका करत एकनाथ खडसे यांनी मोदींवर थेट बोलणे टाळलं आहे.
रक्षा खडसेंबाबत काय म्हणाले एकनाथ खडसे?
रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन भाजपने रावेरची जागा सुरक्षित केली आहे का? असा प्रश्न यावेळी एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर खडसे यांनी म्हटले की, आता अशा अनेक कथा तयार केल्या जातील. त्यावर विश्वास ठेवू नका. उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो. पण उद्या रावेर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, सामना चुरशीचा होईल असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. रोहिणी खडसे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीत. तसंच प्रकृतीच्या कारणामुळे मी ही निवडणूक लढवणार नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे असा सामना रंगणार नाही असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.
हे पण वाचा- सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यावर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया, “अमोल जावळे नाराज…”
रावेरमध्ये सात ते आठजण इच्छुक आहेत. काही उमेदवारांची छाननी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उमेदवाराची उद्या निवड करण्यात येईल. आम्ही तोडीस तोड उमेदवार देणार आहोत. रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकणार आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. आता रावेरमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.