सांगली : नाळ मातीशी आणि देश भक्तीशी हा संदेश घेउन भारतीय सैन्य दलासाठी एक हजार युवकांचे रक्तदान शिबीर दिल्लीतील सैनिक इस्पितळामध्ये १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

या शिबीरासाठी सांगलीतून खास रेल्वेची व्यवस्था चंद्रहार पाटील युथ फौंडेशनच्यावतीने करण्यात आली असून २२ डब्याच्या रेल्वेमध्ये एक बोगी माजी सैनिकांसाठी तर एक बोगी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र डबा आरक्षित असेल. यासाठी रक्तदानासाठी दिल्लीला जाऊ इच्छिणार्‍या तरूणांची नोंदणी मोहिम हाती घेण्यात आली असून या सर्वांच्यामधून वैद्यकीय तपासणी करूनच निवड करण्यात येणार आहे. यासाठी सैन्य दलाची रितसर परवानगी घेण्यात आली आहे. हा आगळा वेगळा उपक्रम भारतीय सैन्यदलासाठी पहिल्यांदाच घेण्यात आला आहे, असे यावेळी पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : “नितेश राणे माझे चांगले मित्र, त्यांना लवकर मंत्रीपद मिळो”, रोहित पवारांचं विधान चर्चेत

या उपक्रमासाठी सुमारे अडीच कोटी रूपये खर्च येणार असून लोकवर्गणीतून हा खर्च करण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती देताच छत्रपती उदयनराजे यांनीही मदत केली असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमाला माजी सैनिकांच्या संघटनांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. यावेळी निवृत्त सुभेदार रमेश चव्हाण, हिंदकेसरी संतोष वेताळ, मदन डाळे, शंभूराजे कदम, सूरज शिंगे आदी उपस्थित होते.