सांगली : घरात ठेवलेल्या १५ लाख रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद देणारा फिर्यादीच चोर निघाल्याची घटना वांगी (ता. कडेगाव) येथील पोलीस तपासात रविवारी उघड झाली. या प्रकरणी किरण कुंभार याला अटक करण्यात आली आहे. न झालेल्या घरफोडीच्या या फिर्यादीच्या निमित्ताने मात्र एक वेगळीच कहाणी समोर आली.
वांगी गावातील सुतारमळा येथे घरफोडीत १५ लाख २० हजार रुपये चोरीस गेल्याचा गुन्हा चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत व कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपास करताना, त्यांच्या पथकाला माहिती मिळाली, की या गुन्ह्यात फिर्यादीने घरफोडीचा बनाव रचला आहे.
हेही वाचा : शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा आदिती तटकरे यांना थेट इशारा
पोलीस पथकाने मग फिर्यादी किरण कुंभार याच्याकडे सखोल तपास केला. पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने बनाव रचल्याचे कबूल केले. त्याने रक्कम घरातच लपवून ठेवल्याची माहिती दिली. मात्र, जेवढी रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद होती, त्यापेक्षा ही रक्कम कमी होती. एक तर मुळात घरीच रक्कम लपवून ठेवायची होती, तर घरफोडीचा बनाव का रचला आणि जेवढी रक्कम चोरीला गेली, त्यापेक्षा लपवलेली रक्कम कमी कशी, असा साहजिकच प्रश्न उपस्थित झाला. त्याबद्दल पोलिसांनी कुंभारला विचारले असता, एक वेगळीच कहाणी पुढे आली.
हेही वाचा : दापोलीत पर्यटकांची ट्रॅव्हलर बस नदीपात्रात कोसळली; सर्व प्रवासी सुखरुप
जी रक्कम, म्हणजे १५ लाख रुपये चोरीस गेल्याचा बनाव रचला गेला, ती मुळात कुंभार याची नव्हतीच. ती त्याला त्याच्या भाच्याने विश्वासाने काही दिवसांकरिता ठेवायला दिली होती. परंतु, त्यातील काही रक्कम, म्हणजे सुमारे पाच लाख रुपये कुंभार याने स्वतःसाठी खर्च केली. आता सगळी रक्कम परत मागितली, तर ती कमी भरणार हे उघड होते. ही लबाडी उघडी पडू नये आणि उलट उरलेली रक्कमही आपल्यालाच वापरायला मिळावी, या हेतूने कुंभार याने बनाव रचला. त्यानुसार, त्याने १० लाख रुपये स्वतःच्याच घरी लपवून ठेवले आणि कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरफोडी झाल्याचा बहाणा केला. तक्रार करताना १५ लाख २० हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रारही केली. अखेर पोलिसांनी हा सगळा बनाव उघडकीस आणून घरात लपवून ठेवलेली एकूण १० लाख ६० हजार रुपये रक्कम जप्त केली आणि कुंभारला बेड्या ठोकल्या.