सांगली : जिल्हा नियोजन समितीसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून शिफारस केलेली यादी शासन दरबारी मंजुरीसाठी प्रलंबित असताना अजितदादा गटाच्या चार नावांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांसह अन्य दोन सदस्यांचा समावेश असून यामध्ये एका महिलेलाही संधी देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य नियुक्ती करण्यात आलेली नाही. महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांना सत्तेत किती वाटा द्यायचा आणि कोणाला संधी द्यायची यावरून यादी अंतिम होत नव्हती. मात्र, अखेर पालकमंत्री खाडे यांनी घटक पक्षांच्या प्रमुखांकडून समिती सदस्यांची नावे मागवून नावे अंतिम केली. या पैकी १२ जणांची नावे अंतिम करून ही यादी अंतिम मंजुरीसाठी शासनाला सादर करण्यात आली आहे.
हेही वाचा : “फालतू माणूस…”, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत असीम सरोदेंची माजी राज्यपालांवर टीका
दरम्यानच्या काळात या यादीतील नावे अद्याप जाहीरच झालेली नसताना समाज माध्यमांवर ही नावांची यादी गेल्या दीड महिन्यापासून प्रसारित होत आहे. यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, समित कदम, पोपट कांबळे, लक्ष्मण सरगर, विनायक जाधव, भिमराव माने, सुहास बाबर, तानाजीराव पाटील आणि आनंदराव पवार यांची नावे आहेत. यामध्ये प्रत्येक घटक पक्षाला संधी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही यादी अद्याप शासनाकडून मंजूर करण्यात आलेली नसल्याने अधिकृत नाही.
तथापि, या दरम्यान, राष्ट्रवादीच्या अजित पवार यांचा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा ही यादी नव्याने करण्याची वेळ आली असताना अचानक दादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, सुनील पवार आणि पुष्पा पाटील यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश सोमवारी रात्री काढण्यात आला आहे.