सांगली : ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर गावी परतत असलेल्या ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने भीषण धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला, एका बालिकेसह चार जण जागीच ठार झाले. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या या अपघातात १० जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील आगळगाव फाट्यावर उभा असणाऱ्या रस्त्याकडेला नादुरुस्त झालेल्या ट्रॅक्टरला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला.
दत्त कारखाना शिरोळ येथील ऊस तोड संपल्याने मंगळवेढा तालुक्यातील ऊस तोड कामगारांना सोडण्यासाठी ट्रॅक्टर जात होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्या नजिक ट्रॅक्टर (केए २८ टीबी ३५६९) आला असता ट्रॅक्टरचा बेल्ट तुटल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा करून दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान या उभा असणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून मालवाहू ट्रक (एपी ३९ युएम ५३८८) या वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये शालन दतात्रय खांडेकर (वय ३४ रा.सीरनांदगी) लगमा तामराया हेगडे (वय ३५) दादा आप्पा आयवळे (वय १७) व निलाबाई परशुराम आयवळे (वय ३, सर्व रा. चिखलगी ता. मंगळवेढा जि. सोलापूर) हे जागीच ठार झाले.
हेही वाचा : बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार
ट्रॅक्टरमध्ये एकूण २१ ऊस तोड मजूर प्रवास करत होते. त्यामधील १० जखमी झाले असून २ व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. ऊसतोडीचे काम झाल्यानंतर गावी जात असताना या झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे चिखलगी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम कवठेमहांकाळ पोलिसांत सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व कवठेमहांकाळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रॅक्टर मधील ऊस तोड कामगारांचे संसार उपयोगी साहित्य या अपघातानंतर सर्वत्र विखुरले गेले होते.