सांगली : गेल्या चार शतकापासून लाखो वाटसरूंना सावली देणारा भोसे (ता. मिरज) यल्लमा मंदिरासमोरील वटवृक्ष यंदाच्या मान्सूनमध्ये सोमवारी आडवा झाला. महामार्गाच्या कामात मुळे कमकुवत झाल्याने आणि सततचा पाउस यामुळे या वटवृक्षाने अखेर मान टाकली. या वृक्षाला वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केल्यामुळे तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वृक्ष वाचविण्याची विनंती केली होती. यामुळे महामार्गाचे आरेखन बदलण्यात आले होते.

मिरज पंढरपूर महामार्गालगत असलेल्या भोसे येथील यल्लमा मंदिरासमोर गेली चार शतके हा वटवृक्ष वाटसरू, वारकरी यांना सावली देत आहे. कोट्यावधी किटक,पक्षी यांचे आश्रयस्थान असलेला हा वटवृक्ष महामार्गात येत असल्याने त्याच्या मृत्यूची घंटा वाजत होती. मात्र, या वटवृक्षाला वाचविण्यासाठी वनराई संस्था व पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत तत्कालिन पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी केंद्रिय मंत्री गडकरी यांना विनंती केली होती. या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रतिसाद देत वटवृक्ष न तोडता रस्त्याचे डिझाईन बदलण्याचे आदेश दिले. त्यानुसार रस्त्याचे आरेखन बदलून वटवृक्षाला खेटून महामार्ग तयार करण्यात आला.

हेही वाचा : मंत्रिपदावरून राष्ट्रवादी-भाजपात मतभेद? अजित पवार म्हणाले, “१५ ऑगस्टपर्यंत…”

महामार्गाच्या कामादरम्यान वृक्षाच्या मुळांना गंभीर इजा पोहोचली असावी यामुळे हा वृक्ष कोसळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेली पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने मुळे कमकुवत झालेला हा वटवृक्ष स्वत।च्याच भाराने कोसळला असावा अशी ग्रामस्थांची धारणा आहे. या वटवृक्षाचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.