सांगली : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून छत्तीसगडमध्ये पळवून नेण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय तरुणाला जिल्हा सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी ठोठावली. सांगली येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.के. शर्मा यांचेसमोर खटल्याचे काम चालू होते. आरोपी यशवंतसिंह राजाराम मरकाम, (वय २०, सध्या रा. वानलेसवाडी, ता. मिरज, जि. सांगली, मूळ रा. दादनकापा, लुर्मी, जि. बिलासपूर, राज्य – छत्तीसगढ) याला दोषी धरुन त्याला ५ वर्षे सश्रम कारावास व दंड रुपये ५ हजार व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कैद सुनावण्यात आली.
हेही वाचा : सांगली : माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन
दंडाची रक्कम पिडीत मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याबाबतचा आदेश झाला. याकामी सरकापक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले. थोडक्यात हकीकत अशी की, पिडीत मुलीला दि.११ मार्च २०१९ रोजी लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून तिला तिचे राहते घराजवळून आरोपीने पळवून नेऊन पुणे येथे ठेवले. दौंड मार्गे छत्तीसगढ येथे घेऊन जात असताना दौंड रेल्वे स्टेशन येथे मिळून आला आहे. या खटल्यातील एका साक्षीदाराने प्रवासादरम्यान आरोपीची वर्तणूक संशयास्पद आढळून आल्याने रेल्वे पोलीसांना कळवले. पोलीसांनी त्यांचेकडे चौकशी केली असता सदर आरोपीने मुलीस पळवून घेऊन आलेचे समजले. ही साक्ष न्यायालयात महत्वपूर्ण ठरली.