सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे अभाविपच्या विद्यार्थांनी शाळा, महाविद्यालयाला जाण्यासाठी वेळेवर बस नाहीत म्हणून बसस्थानकाच्या गेटवर शेकडो विद्यार्थी अभ्यासाला बसवले व वाहतूक रोखून धरत अनोखे आंदोलन केले. शिराळा हा डोंगराळ भागातील तालुका आहे. सर्व तालुका ग्रामीण आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापर्यंत गावात सोयी उपलब्ध आहेत. पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिराळा, इस्लामपूर या ठिकाणी जावं लागतं. त्यासाठी विद्यार्थी एसटी बसने प्रवास करत असतात. पण मागील काही दिवसांपासून शिराळा तालुक्यातील अनेक गावांना शाळा, कॉलेजला येण्यासाठी व नंतर घरी जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा महाविद्यालायला जावं लागतं. घरी जाण्यासाठी बस नसल्याने रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी बस स्थानकावरच असतात.
हेही वाचा : मराठा आरक्षण सल्लागार मंडळावर सुविधांचा वर्षाव; चार लाख मानधन, विमान प्रवास, २४ तास…
“विद्यार्थ्यांना एसटीच्या गलथान कारभारामुळे वेळेवर बस मिळत नाहीत. वारंवार निवेदन देऊनही बस सुरू न केल्याने बस स्थानकावरच आम्ही अभ्यासाला बसलो”, असे अभाविपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल पाटील यांनी सांगितले. यावेळी अभाविप प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्निल पाटील, शुभम देशमुख, सुजित पाटील, अनुज पाटील, अखिलेश पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .