सांगली : मिरजेतील तालुका क्रीडा संकुलात श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असून यासाठी क्रीडा अधिकार्यांची अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह संयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी गुरूवारी केली. मिरज तालुका संकुल येथे राममंदिर प्रतिकृती उभारून त्याठिकाणी अयोध्या येथील राममंदिर उद्घाटन सोहळ्यासोबत सोहळा पार पडणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी उद्घाटन पार पडले, पण संयोजकांनी सदर बाबत जिल्हा क्रीडा संकुल प्रशासनाकडे केवळ पत्र दिल्याचे सांगितले. कोणतीही परवानगी नसताना शासकीय मालमत्तेत उद्घाटन घेणे चुकीचे व निषेधार्थ आहे. या प्रकरणी पालकमंत्री यांच्यासह संयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. कांबळे यांनी केली आहे.
हेही वाचा : वंचितची लोकसभेला महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री म्हणाले…
ते म्हणाले, सदर राम मंदिर प्रतिकृतीला आमचा विरोध नसून आणखी मोठी प्रतिकृती उभी राहावी व दिमाखदार सोहळा पार पडावा, अशी आमची भूमिका असून याबाबत संयोजकांनी मात्र चुकीच्या पद्धतीने शासकीय मालमत्तेचा वापर करू नये. तर रितसर परवानगी घेऊन उद्घाटन करण्याची मागणी केली. तसेच करोना काळात हॉस्पिटलसाठी जिल्हा क्रीडा संकुलातील हॉल हा जिल्हा प्रशासनाकडे दिला होता. परंतू कोविड काळ संपूनही आजतागायत सदरची इमारत जिल्हा क्रीडा संकुलकडे देण्यात आलेली नाही. यामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. जिल्हा व तालुका क्रीडा अधिकार्यांनी संबंधितांवर योग्य ती कारवाई केली नाही तर एमआयएमच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही डॉ. कांबळे यांनी दिला.