सांगली : ऊस उत्पादकांना दिवाळीला पैसे देऊ शकत नाही अशा नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहण्याचा काय अधिकार, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता उपस्थित केला. इस्लामपूर मतदारसंघातील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ आष्ट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांची जाहीर सभा शनिवारी झाली. या वेळी उमेदवार भोसले-पाटील, खा. धैर्यशील माने, गौरव नायकवडी, राहुल महाडिक, जयवंत पाटील आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की गेली ३५ वर्षे एकाच व्यक्तीकडे नेतृत्व असताना, अर्थ खाते असताना विकासकामासाठी निधी का देऊ शकले नाहीत, हा प्रश्न आहे. आपल्यापेक्षा अन्य कोणाचे नेतृत्वच उभे राहू नये ही भूमिका यामागे असावी. राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना असतानाही उसाचा दर का कमी दिला जातो? आमच्या भागापेक्षा साखर उतारा जास्त असताना कमी दर देऊन फरकातील दोन-सव्वादोनशे रुपये कुठे गेले असा सवालही त्यांनी केला. ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी पैसे द्यायला हवे होते; मात्र ते देऊ शकले नाहीत आणि मुख्यमंत्रिपदाच्या गप्पा मारतात. आज आष्टा, इस्लामपूर बसस्थानकांची अवस्था कशी आहे? पोलिसांसाठी घरे बांधता आली नाहीत. आमदार जयंत पाटील यांच्या गावचे- कासेगावचे पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत आजही असेल, तर मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील सर्व पोलीस ठाणी भाड्याच्या जागेत ठेवणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”

या भागात औद्योगिक वसाहत स्थापन करायला हवी होती. आता आमदार पाटील यांचे व्याही किर्लोस्कर आहेत. त्यांना सांगून एखादा प्रकल्प सुरू करावा, मग गरजू तरुणांना रोजगार मिळेल, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. केंद्रात आणि राज्यात एका विचाराचे सरकार असेल, तर विकासाला गती देता येते असे सांगून आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जात असून, विधानसभेच्या मिळालेल्या जागामध्ये १० टक्के जागा अल्पसंख्याकांना, १० टक्के महिलांना, साडेबारा टक्के आदिवासींना आणि साडेबारा टक्के मागासवर्गीयांना दिल्या असून, सर्व जातींना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभा निवडणुकीत भोसले-पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा :Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य

‘लाडकी बहीण’मुळे विरोधक अस्वस्थ

आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना वीज देयक माफी योजना लागू केली. यासाठी ७५ हजार कोटींची तरतूद केली. त्या वेळी विरोधकांनी तिजोरी रिकामी केल्याची टीका केली. मात्र, या योजनांना चांगला प्रतिसाद मिळतोय हे लक्षात येताच, विरोधक अस्वस्थ झाले आहेत. टीका करू लागले आहेत. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील पंचसूत्री योजना जाहीर केली. यासाठी ३ लाख कोटी रुपये लागणार आहेत. मग या योजनांसाठी पैसे कुठून आणणार याचे उत्तर मात्र त्यांच्या एकाही नेत्याने दिलेले नाही, अशी टीका पवार यांनी या वेळी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli ajit pawar criticizes jayant patil for dreaming to become chief minister css