सांगली : बळकट समाज व्यवस्थेसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. संकल्प सिद्धीसाठी शरीरस्वास्थ्य हे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत सांगली येथील संजयनगर शहरी आरोग्य केंद्र क्र. ६ येथे मोफत आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था-मुंबईचे सहसंचालक डॉ. राहुल जाधव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चौगुले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. काकडे म्हणाले, बऱ्याचदा महिला, गोरगरीब नागरिक हे आजार खूप दिवस अंगावर काढतात, त्यामुळे ते आजार पुढील काळात गंभीर स्वरूप प्राप्त करतात. त्यामुळे आपल्या भागामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांचे निदान करण्यात येत आहे व त्यामध्ये उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासल्यास संदर्भ सेवा पुरविली जाणार आहे. याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या अभियानांतर्गत सेवा पुरवण्यात येणाऱ्या अतिजोखमीचा असणारा समुदाय यांचे समुपदेशन, संशयित क्षयरोग रुग्ण तपासणी, एच. आय. व्ही. आणि गुप्तरोग तपासणी व उपचार, कावीळ, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ॲनिमिया निदान व उपचार तसेच इतर अत्यावश्यक गरजेनुरूप तपासणीबाबत लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदर सेवा सर्व शिबिरार्थींना देण्याबाबत सतर्क राहावे, अशा सूचना दिल्या.