सांगली : शाळेत चिडवू नकोस असे सांगितल्याच्या रागातून नववीच्या वर्गातील मुलाने वर्गमित्राच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतील आरवाडे हायस्कूलमध्ये सोमवारी सायंकाळी घडला. जखमी मुलावर खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून या प्रकरणी अल्पवयीन मुलावर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. नववीमध्ये शिकत असलेला सलमान मुल्ला (वय १४, रा. शंभर फुटी) या मुलास वर्गातील श्रीवर्धन पाटील हा मुलगा व इतर मुले भाजीवाला, भाजीवाला म्हणून चिडवत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिडवल्यावरून दोघांमध्ये किरकोळ वादही झाला होता. या वादातून पाटील या मुलाने सोमवारी सायंकाळी दप्तरातून आणलेल्या कोयत्यासारख्या हत्याराने सलमानच्या मानेवर वार केले. या गंभीर प्रकारामुळे शाळेतील अन्य मुले सैरभर झाली. शाळेतील शिक्षकांनी जखमी सलमानला तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, त्याच्या पालकांनी पुन्हा एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा : मोठी बातमी! ‘वंचित’च्या प्रयत्नांना यश, महाविकास आघाडीत समावेश; काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचे एकमत!

या गंभीर प्रकरणाची शहर पोलीसांनीही तातडीने दखल घेतली असून उप अधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनीही याठिकाणी भेट देऊन शाळेतील अन्य मुलांशी संवाद साधला. धक्कादायक प्रकार तोही वर्गात घडल्याने शाळा व्यवस्थापनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून मुलांचे समुपदेशन मानसोपचार तज्ञांकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli at arwade high school boy attacked his friend with koyta in classroom css
Show comments