सांगली : गेल्या दहा वर्षांत केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवून भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांना पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या सावर्डे ( ता. तासगाव) येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. खासदार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गेल्या ३२ वर्षांतील कार्यकर्त्यांच्या संघर्षमय आठवणींनी खा. पाटील भावनिक झाले.
या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, भाजप निवडणूक जिल्हा प्रभारी दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, युवा नेते प्रभाकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे, माजी सरचिटणीस नितीन पाटील यांची भाषणे झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र निवडणूक प्रभारी देशपांडे म्हणाले, यापुर्वीच्या काळात कार्यकर्त्यांनी मोठ्या हिमतींने संघर्ष करत पक्षाची भूमिका लोकापर्यंत पोहचवली आहे. आता झालेली विकास कामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांगिन विकासाची दृष्टी मतदारापर्यंत पोहोचवायची आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जी प्रगती झाली आहे ती लोकापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. ते निश्चितपणे पार पाडतील आणि भाजप उमेदवाराचा मोठ्या मताधिक्यांने विजय होईल असा विश्वास श्री. देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : “माढा, सातारा किंवा पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी”, राज्यातील कार्यकर्त्यांचा शरद पवारांना आग्रह
खा. पाटील म्हणाले, जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते पाठीशी उभा राहून या जिल्ह्यात इतिहास घडवतात. हा इतिहास घडविणाऱ्या मंडळींचा मला सार्थ अभिमान आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय ताकदीने आणि ठरवलेल्या नियोजनानुसार काम करायचे आहे. आपल्याला मोठे यश मिळणार आहे. राज्यात आणि देशात सर्वाधिक मतांनी विजयी व्हायचे आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्या पाठीशी आहे. देशाचे नेते नरेंद्र मोदी एक ही दिवस विश्रांती न घेता देशसेवा करत आहेत. आपल्याला त्यांच्या बरोबर सेवा करण्याची संधी मिळाली. देशातील आणि राज्यातील नेत्यांनी विश्वास दाखवून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पार्टी काम पाहून संधी देणारा पक्ष आहे. तासगाव तालुक्याचं मताधिक्य लाखांपेक्षा जास्त असले पाहिजे.