सांगली : मिरजेतून कर्नाटकात जाणार्‍या रस्त्यावर तस्करीसाठी वाहतूक करण्यात येत असलेली १९ कोटींची व्हेल माशाची उलटी सोमवारी मध्यरात्री जप्त करून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि मिरज वाहतूक पोलीसांनी संयुक्तपणे वनविभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत श्री. फुलारी यांनी सांगितले, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांना जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असलेल्या व्हेल माशांच्या उलटीची म्हणजेच अंबरग्रिसची मिरजेतून कर्नाटकात विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीच्या आधारे म्हैसाळला जाणार्‍या रस्त्यावर पोलीसांचा सापळा लावण्यात आला. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वांडरे कॉर्नर येथे मोपेड (एमएच १० डीपी ९७०८) आणि अल्टो मोटार (एमएच ०७ एएस ०११७) ही संशयित वाहने आली असता या वाहनांची झडती घेण्यात आली. यावेळी वाहनात व्हेल माशाच्या उलटीच्या १९ किलो १७२ ग्रॅम वजनाच्या तीन लाद्या मिळाल्या. याचे आंतरराष्ट्रीय मूल्य १९ कोटी १७ लाख २० हजार रूपये आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!, “शिवतीर्थावर हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला….”

या प्रकरणी मंगेश माधव शिरवडेकर (वय ३६, रा. जवाहरनगर कोल्हापूर), संतोष उर्फ विश्‍वास श्रीकृष्ण सागवेकर (वय ३५ रा. वायरी, मालवण) आणि वैभव भालचंद्र खोबरेकर (वय २९ रा. देवबाग, मालवण) या तिघांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी वापरलेली दोन्ही वाहने पोलीसांनी जप्त केली असून ही कारवाई सहायक निरीक्षक पाटील यांच्यासह उप निरीक्षक गौतम सोनकांबळे, हवालदार वैभव पाटील, सचिन सनदी, निलेश कदम, संदिप मोरे, अमिरशा फकीर, लक्ष्मण कौजलगी, श्रीकांत केंगार, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, बसवराज कुंदगूळ, वाहतूक शाखेचे फारूक नालबंद, राहूल सातपुते, उदय लवटे आदींच्या पथकाने केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli at miraj ambergris of rupees 19 crores seized by police and three arrested css