सांगली : ज्या नागरिकांना अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणे अशक्य आहे अशांसाठी मिरजेत सुमारे ४५ लाख रूपये खर्च करून अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने याठिकाणी सलग दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.
तालुका क्रीडा संकुलामध्ये २५ हजार चौरस फुटांमध्ये ही प्रतिकृती गेल्या एक महिन्यापासून उभारण्यात येत असून ६५ फूट उंचीच्या प्रतिकृतीमध्ये २२ शिखरे उभारण्यात आली आहेत असे सांगून पालकमंत्री खाडे म्हणाले, या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मूर्तीची रविवारी मिरज शहरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात हत्ती, घोडे, उंट यांसह शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच दि. २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील भक्तांचे होम करण्यात येणार असून यासाठी १०८ होमकुंड आहेत.
हेही वाचा : सांगली : बोगस फर्मद्वारे महाराष्ट्र बँकेला ७२ लाखांचा गंडा
या ठिकाणी रोज धार्मिक कार्यक्रमांसोबतच शालेय नृत्य स्पर्धा, देशभक्तीपर गीतगायन होणार असून रामायण मालिकेतील अरूण गोविल आणि दीपिका टोपीवाले यांची मुलाखत, बेला शेंडे यांचा गायनाचा कार्यक्रम, अवधूत गांधी यांचे भारूड व शंकर अभ्यंकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी स्थायी सभापती सुरेश आवटी, सुशांत खाडे, माजी नगरसेवक गणेश माळी आदी उपस्थित होते.