सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे सुरू करण्याचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या अधिसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी हा ठराव मांडला तर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी सूचक म्हणून पाठिंबा दिला. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात सुरू करण्याबाबतच्या हालचाली गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, उपकेंद्रासाठी स्थळ निश्चिती होत नाही. याबाबत शुक्रवारी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत श्री. पाटील यांनी हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू करण्यात यावे असा ठराव मांडला.
हेही वाचा : “जरांगे पाटील, छगन भुजबळांना हात जोडून विनंती…”, नेमकं उदय सामंत काय म्हणाले?
या ठरावाला प्राध्यापक संघटना, विद्यापीठ विकास आघाडी, तसेच विकास मंच या सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. या ठरावावर सांगली सुटाचे अध्यक्ष प्रा.डॉ.निवास वरेकर, संजय परमणे,श्री गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. अधिसभेत मंजूर करण्यात आलेला हा ठराव विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे जाईल आणि मंजुरी मिळेल. या उपकेंद्रामुळे खानापूर सह आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस व कडेगांव या दुष्काळी तालुययातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण तालुययातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे, असे मत अॅड. पाटील यांनी ठराव मांडत असताना व्यक्त केले.