सांगली : तासगाव तालुक्यात तीन गावचे रस्ते एकत्रित येतात, अशा तिकाटण्यावर भानामती करण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्त्यांनी शालेय मुला-मुलींना सोबत घेऊन हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सांगत उतारा म्हणून टाकलेल्या वस्तू जाळून टाकल्या. तासगाव तालुक्यातील चिखलगोठण फाट्यावरील निंबळक, बोरगांव तिकाटण्यावरून बोरगाव माध्यमिक शाळेस जाणार्‍या रस्त्यावर अज्ञातांनी भानामतीचा प्रकार केल्याचे सकाळी उजेडात आले. सूप, दुरडी, लिंबू, नारळ, लवंग, मिरे, काळे कापड आदी वस्तू भानामतीसाठी वापरण्यात आल्या होत्या. या वस्तूंवर हळदी-कुंकू टाकण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमावस्या, पौर्णिमा, बुधवार आणि शनिवार या दिवशी प्रामुख्याने या तिकाटण्यावर वारंवार अशा वस्तू नजरेस पडत आहेत. यामुळे यावेळी या प्रकाराबाबत शाळेस जाणार्‍या मुलामुलींमध्ये अकारण भीती निर्माण होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेवर घाव घालण्याचे ठरवून आज सकाळी शाळेतील मुला-मुलींना सोबत घेऊन या वस्तूंचे सामुहिक दहन करीत या प्रकाराला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : “मोदी सरकार फक्त बघ्याची भूमिका घेणार असेल तर…”, शरद पवार यांचा ‘हा’ इशारा

या प्रकारांना वेळीच आवर घालून समाजात अंधश्रद्धा निर्माण करणार्‍यांवर पोलीसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी केली. शाळेतील शिक्षक पांडूरंग महाडिक, सुंदरनाथ पाटील यांच्यासह किरण निकम, शंकर सोमदे, किरण पाटील, अधिकराव साळुंखे, अनिल पाटील, अक्षय पवार, महादेव पवार यांनी या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या या वस्तू तिकाटण्यावर जाळून नष्ट केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli at tasgaon bhanamati by unknown persons to create fear among the villagers css