सांगली : बोगस फर्मच्या नावे कर्ज काढून ७२ लाखाला महाराष्ट्र बँकेला गंडा घातला असल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या विश्रामबाग शाखेचे व्यवस्थापक कार्तिक कथिरवेल यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार कस्तुरी माळी यांनी कुटुंबिय सुरेश माळी व सुधीर माळी यांच्या नावाने सुधीर प्रॉडक्ट्स या नावाची फर्म स्थापन केली. या फर्मच्या नावे महाराष्ट्र बँकेतून प्रथम ४६ लाख व दुसर्यांदा २६ लाख असे ७२ लाख रूपये कर्ज उचलले.
हेही वाचा : आरोग्य विद्यापीठाची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार
श्रीमती माळी या बँकेत काम करतात. मात्र, घेण्यात आलेल्या कर्जाचा वापर व्यवसायासाठी केला नाही. फर्मच्या नावे बनावट प्रमाणपत्र व कागदपत्रे तयार करून बँकेत सादर केली. मुळात ही फर्मच अस्तित्वात नाही. डिसेंबर २०१८ ते गुरूवार दि. १९ जानेवारी २०२४ अखेर हा बोगस व्यवहार सुरू होता. तपासणीत ही माहिती उघड होताच तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.