सांगली : नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले जन्म व मृत्यू दाखले आता टपालाने घरपोच देण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली असून, या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी केले.
जन्म व मृत्यू दाखले हे नागरिकांना आवश्यक असे दस्तऐवज असून, वेळेत आणि घरी मिळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत जन्म व मृत्यू दाखले पोस्टाद्वारे घरपोच नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने उपक्रम हाती घेतला आहे.
दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून मागणी नोंदवावी लागणार आहे. यानंतर आवश्यक शुल्क ऑनलाईन भरल्यानंतर दाखला तयार झाल्यावर घरपोच होणार आहे, अशी माहितीही प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.