सांगली : जिल्हा भाजप कार्यकारिणीमध्ये २६ पदाधिकार्यांसह ९० सदस्यांना स्थान देण्यात आले असून यामध्ये २० महिलांना संधी देण्यात आल्याची माहिती पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते.
नवीन जिल्हाध्यक्ष निवडीनंतर पक्षाची जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, १० चिटणीस यांचा समावेश असून ६४ जणांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलेल्या सात महिलांना उपाध्यक्ष, सरचिटणीस व चिटणीसपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा : या गावात आहेत २१ पुरातन गणेशमूर्ती
जिल्हा सुकाणू समितीमध्ये प्रदेश समितीकडून नियुक्त करण्यात आलेले सुरेश हळवणकर, मकरंद देशपांडे यांच्यासह माजी अध्यक्ष, खासदार, विद्यमान व माजी आमदार यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लोकसभा व विधानसभा मतदारसंघ प्रमुख, महिला आघाडी अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश गढळे, अल्पसंख्याक मोर्चा आजम मकानदार, महिला मोर्चा उषाताई दशवंत आणि किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी राजाराम गरूड आदींची निवड करण्यात आल्याचे श्री. पाटील यांनी जाहीर केले. मंडळ अध्यक्ष म्हणून १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी निवडत असताना सर्व विभागांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेही वाचा : रायगड : तडीपारीच्या प्रस्तावांवर तीन वर्षानंतरही निर्णय नाही; गुंड मोकाट…
येत्या चार दिवसात शहर जिल्हा कार्यकारिणीचीही यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी जाहीर केले.यावेळी माजी अध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, लोकसभा प्रमुख दीपक शिंदे आदी उपस्थित होते.