सांगली : सांगली मतदार संघातून विधानसभेसाठी उमेदवारी न मागण्याचा निर्णय भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर करताच बुधवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निर्णयाचा फेरविचार करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या सांगली दौऱ्यावेळी याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे आमदार गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार गाडगीळ यांनी मंगळवारी रात्री येत्या विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार नसल्याचे सांगत हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे एका प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले. गेल्या दहा वर्षांत आपण सांगली मतदार संघासाठी केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत अनेक नागरी समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रयत्नांना जनतेनेही चांगली साथ दिली. तरीही कुठेतरी थांबायचे म्हणून निवडणुकीच्या मैदानातून बाजूला जात असलो तरी पक्ष देईल त्या उमेदवाराचा मी प्रचार करेन, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन, असे या प्रसिद्धी पत्रात आमदार गाडगीळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : कोयना शंभर टक्के ! पश्चिम घाटातील १२ पैकी आठ धरणे काठोकाठ

दरम्यान हे पत्र रात्रीपासून समाज माध्यमातून प्रसारित होताच भाजपमध्ये खळबळ माजली असून, बुधवारी सकाळी महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक, माजी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, गीतांजली ढोपे-पाटील आदीसह कार्यकर्त्यांनी आमदार गाडगीळ यांच्या निवासस्थानी धाव घेत निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली. मात्र आ. गाडगीळ यांनी आपली भूमिका सद्यस्थितीत कायम असल्याचे सांगत राष्ट्रीय महासचिव श्री. तावडे सांगली दौऱ्यावर आल्यानंतर अधिक स्पष्ट खुलासा होईल, असे सांगत कार्यकर्त्यांची समजूत काढली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli bjp mla sudhir gadgil withdraw his candidature for upcoming assembly elections 2024 css