सांगली : मुलीला पळवून नेल्याच्या कारणातून मुलाच्या वडिलांना वीजेच्या खांबाला दोरीने बांधून मारण्याचा धक्कादायक प्रकार मांगले (ता. शिराळा) येथे घडला असून मारहाणीमध्ये दादासाहेब रामचंद्र चौगुले (वय ५५) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन महिलांसह बारा संशयितांविरूद्ध खूनाचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मुख्य संशयित सुरेश पाटील यांच्या मुलीचे मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामुळे चौगुले आणि पाटील कुटुंबात वादही झाला होता. पाटील कुटुंबाचे गावातील धनटेक वसाहतीमध्ये राहते घर असून याच ठिकाणी चौगुले यांचे जनावराचे शेड आहे. बुधवारी सकाळी चौगुले दूध काढण्यासाठी गेले असता संशयित सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी चौगुले यांना तुमचा मुलगा गणेश याने मुलीला दुचाकीवरून पळवून नेले आहे, तो कुठे आहे अशी विचारणा करीत वीजेच्या खांबाला दोरीने बांधून हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना शिराळा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : “ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर…”, एसीबीचे छापे पडल्यानंतर राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

याप्रकरणी संशयित सुरेश महादेव पाटील यांच्यासह संजय पाटील, प्रविण पाटील, सनिराज पाटील, संग्रामसिंग पाटील, सचिन पाटील, अजय पाटील, रविंद्र पाटील, संदीप पाडळकर यांच्यासह कविता पाटील, शुभांगी पाटील आणि पद्मा पाटील या महिलांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा गणेश मुलीसह पोलीस ठाण्यात हजर झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader