सांगली : शासनाने शेतकर्यांना दिलेल्या दुष्काळ मदत निधीवर २ कोटी ४३ लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १३ कर्मचार्याविरूध्द संबंधित पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली. अपहार करणार्या कर्मचार्यांना संचालक मंडळाने यापुर्वीच निलंबित केले आहे.
जिल्हा बँकेच्या बसरगी, नेलकरंजी, तासगाव, निमणी, सिध्देवाडी आणि हातनूर या सहा शाखामध्ये हा अपहार उघडकीस आला आहे. प्रारंभी अपहार प्रकरणी तक्रार समोर येताच बँकेन २१९ शाखांची विशेष तपासणी पथकामार्फत सर्व शाखांचे लेखापरिक्षण केले असता सहा शाखामध्ये २ कोटी ४३ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून या अपहारातील सुमारे ९० लाख रूपये वसुल करण्यात आले आहेत.
हेही वाचा : इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना प्रत्युत्तर; शरद पवारांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले…
अपहार उघडकीस येताच संबंधित शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यानंतर १३ कर्मचार्याविरूध्द संबंधित पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेले कर्मचारी असे प्रमोद कुंभार, योगेश वजरनीकर, संजय पाटील (तासगाव) अविनाश पाटील, अविनाश सुर्यवंशी, सुरेश कोळी (सिध्देवाडी) विजय यादव (निमणी), बाळासो सावंत (पलूस), इंद्रजित वाघमारे बसरगी, मच्छिंद्र म्हारगुडे, प्रतिक पवार व दिगंबर शिंदे (नेलकरंजी).