सांगली : मिरजेतील कार्यालय बांधण्याच्या कारणावरून शिवसेनेच्या दोन गटांत सोमवारी हातघाई व शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला. ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा करीत आपल्याच शिवसेनेच्या नावे ही जागा असल्याचा दावा केला, तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी वादात सापडायला नको म्हणून काढता पाय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरज किल्ला भागातील सेतू कार्यालयाजवळ असलेल्या जागेवर कार्यालय बांधण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सुरू होता. मात्र ही जागा शिवसेनेच्या नावे असून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेत महापालिकेकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली.

हेही वाचा : “१० जानेवारीनंतर भाजपा, गद्दार गट एकमेकांच्या उरावर बसेल”, किरण सामंतांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचा दाखला देत ठाकरे गटाचा टोला

शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण रजपूत आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी शिवसेनेच्या नावे ही जागा पटवर्धन सरकारने शिवसेनेला दिली असल्याचे सांगत आमचाच हक्क असल्याचे सांगत जागेवर कब्जा आमच्याच गटाला राहील अशी भूमिका घेतली. यावरून उभय गटांत जोरदार वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. मात्र, उपस्थित असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी दोघा शहर प्रमुखांना हातघाई करण्यापासून रोखले. दरम्यान, या जागेवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, दोन गटांतील वाद विकोपाला गेल्यानंतर या पथकाने घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

पोलीस बंदोबस्तात कार्यालयावर कारवाई

दिवसभर कार्यालय जागेच्या मालकीवरुन शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटात सुरु असलेल्या वादानंतर सायंकाळी पोलीस बंदोबस्तात कार्यालय अनधिकृत ठरवत अस्थायी शेडवजा कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. यावेळी पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात झटापटही झाली. प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, तालुका प्रमुख संजय काटे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या दबावाने पोलीसांनी ही कृती केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli clashes between shivsena eknath shinde uddhav thackeray faction over the issue of shivsena office at miraj css
Show comments