सांगली : देशातील, राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस कंगाल होत निघालाय आणि सरकारचे सगळे दलाल मालामाल होत आहेत. या कारभाराने सामान्य माणसाच्या आयुष्याचा चिखल झाला आहे, असा आरोप करत शुक्रवारी काँग्रेसने महायुती सरकारविरुद्ध चिखल फेक आंदोलन केले. येथील काँग्रेस कमिटीसमोर महायुतीच्या फलकावर चिखल फेकण्यात आला.
जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील जनता समस्यांचा सामना करत असताना भाजपाप्रणित युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहेत, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केला.
हेही वाचा : सातारा: विजेचा धक्का लागून दोन बैलांचा मृत्यू
आमदार श्री.सावंत म्हणाले, शेतकऱ्यांची अडवणूक होते आहे. पोलिस भरती चिखलात रुतली आहे. सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालढकल होत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या खून पडत आहेत. जातीधर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग केली जात आहे. सरकारच्या या कारभारावर चिखल फेकून आम्ही निषेध व्यक्त करतो.
शहर जिल्हाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, राज्यातील जनतेत महायुती सरकारबद्दल तीव्र असंतोष धुमसतोय. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसले. तो ट्रेलर होता. विधानसभा निवडणुकीत उर्वरीत पिक्चर दिसेल. सामान्य जनता महायुतीच्या प्रत्येक नेत्याला त्याची जागा दाखवेल. महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा घोटाळा, खते व बियाणांचा काळाबाजार, घरगुती वीज बिलात भरमसाठ वाढ, पेपरफुटी या समस्यांतून सामान्य माणूस पिचला आहे. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही. कठीण काळात जनतेची पिळवणूकच केली जात आहे.
हेही वाचा : रायगड : रिझवी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, खालापूर तालुक्यातील वावर्ले येथील घटना
या आंदोलनात प्रा. डॉ. सिकंदर जमादार, माजी नगरसेवक अय्याज व वहिदा नायकवडी, मंगेश चव्हाण, मयूर पाटील, अल्ताफ पेंढारी, इलाही बारुदवाले, तौफिक शिकलगार, जतचे तुकाराम माळी, बाबासाहेब कोडग,अमित पारेकर, महावीर पाटील आदीसह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते