सांगली : गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसची बळकावलेली इमारत परत दिली नाही तर आपण राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा प्रचार करणार नसल्याचे पत्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले आहे.

इस्लामपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी चार हजार चौरस फूट जागेवर इमारत असून ही इमारत काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्या मालकीची आहे. या जागेच्या कागदोपत्रीही काँग्रेस तालुकाध्यक्षाचे नाव आहे. शासकीय दराने ही जागा खरेदी करून काँग्रेसने ही इमारत उभी केली असून सध्या ही इमारत राष्ट्रवादीने (शरद पवार) बळकावली आहे. या ठिकाणी पक्षीय कोणतेही काम केले जात नाही, तरीसुध्दा कब्जा मात्र राष्ट्रवादीकडेच आहे.

हेही वाचा : सांगली: बिघडलेल्या हवामानाचा आले, हळदीला फटका; कंदकुजचा धोका बळावला, उत्पादन घटणार

काँग्रेसच्या मालकीची ही इमारत परत मिळावी अशी वारंवार मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे खा. पवार यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष खा. खरगे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत पत्र पाठविले आहे. जर या इमारतीचा ताबा काँग्रेसला दिला नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील संभाव्य उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे पत्रातून कळविण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.