सांगली : सांगलीमध्ये काँग्रेसअंतर्गत बंडखोरी करण्यासाठी जयश्री पाटील यांना कोणी फितवले हे ज्या दिवशी समजेल, त्या दिवशी त्यांची काही खैर नाही, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी बंडखोरी करण्यास भाग पाडणाऱ्यांना इशारा दिला. दरम्यान बंडखोरास मत दिले तर ती भाजपला मदत होणार असल्याने त्यांनाही मतदान न करण्याचे आवाहन कदम यांनी या वेळी केले.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, श्रीमती पाटील या भोळ्या व सरळमार्गी आहेत. लोकसभेवेळीच विशाल पाटील खासदारपदासाठी, पृथ्वीराज पाटील विधानसभेसाठी आणि श्रीमती पाटील यांना विधान परिषद असे ठरले होते. मात्र, त्यांना कुणी तरी फितवले आणि बंडखोरी करण्यास भाग पाडले. ज्या दिवशी फितवणारा कोण हे समजेल त्या दिवशी त्याची खैर राहणार नाही. बंडखोरीमुळे विशाल पाटील यांची कोंडी झाली आहे. जे घडायला नको होते ते सांगलीत घडले.
हेही वाचा : Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
उमेदवार श्री. पाटील म्हणाले, बंडखोर उमेदवार पाटील यांच्याशी आमचे वैर नाही, मात्र, भाजपची आता खैर राहणार नाही. बंडखोरी असली तरी काँग्रेस आता ताकदीने निवडणूक लढवेल आणि विजयसुध्दा संपादन करेल. सांगलीकरांनी एकदा का आमदारपदाची संधी दिली तर विकास म्हणजे नेमका काय असतो हे सांगलीला दाखवून देईन. बंडखोरी भाजप पुरस्कृत असल्याने त्यांना मत दिले तर भाजपला मदत होणार आहे. यामुळे मतदारांनी भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीलाच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.