सांगली : दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाची संधी साधून शिराळा तालुक्यात सात ठिकाणी तर मिरजेत एका ठिकाणी चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला असून लाखो रूपयांचा ऐवज व पूजेसाठी मांडण्यात आलेली रोकड लंपास झाली आहे. रविवारी रात्री सर्वत्र लक्ष्मीपूजनाची धामधूम झाली. लक्ष्मी पूजनावेळी अनेक कुटुंबांमध्ये लक्ष्मी देवीच्या फोटोसह सुवर्णालंकार, रोख रक्कम यांची पूजा करण्याची प्रथा आहे. सकाळी उत्तर पूजा विधी झाल्यानंतरच पूजेत वापरण्यात आलेले दागिने व रोकड वापरण्यात येते. हीच संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
मिरज शहरातील वखारभाग येथे श्री. माळी यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी रात्री अकरा नंतर घरी सामसूम झाल्यानंतर पूजेसाठी ठेवण्यात आलेले सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही माहिती मिळताच पोलीसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी रात्रीच नाकाबंदी केली होती. तपासासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. मात्र, चोरटे हाती लागलेले नाहीत. याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
हेही वाचा : “८० वर्षांच्या वडिलांना कोर्टात एकटं जाऊ देणार नाही, सध्या…”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या…
शिराळा तालुक्यातील तीन गावामध्ये चोरट्यांनी सात ठिकाणी हात साफ केला आहे. मध्यरात्री समतानगर, गवळेवाडी येळापूर या परिसरात चोरट्यांनी सात घरात चोरी करून दहा तोळे सोने, रोख 20 हजार रूपये आणि दोन दुचाकी लंपास केल्या आहेत. याबाबत कोकरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.