सांगली : अनोळखी नंबरवरून फोनद्बारे सीआयडीकडून बोलत असल्याचे भासवून सांगलीतील एका डॉक्टरांची १९ लाखाला ऑनलाईन लूट करण्याचा प्रकार घडल्याची माहिती रविवारी मिळाली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, डॉ. निकेत शहा यांना दि. ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान दोन वेगवेगळ्या नंबरच्या भ्रमणध्वनीवरून अज्ञाताने संपर्क साधला. तुम्ही चीनला पाठविलेल्या कुरियरमध्ये १० बनावट पारपत्र, व्हीसा, लॅपटॉप व चीनचे चलन आहे. हे सर्व बेकायदेशीर असून तुमच्या भ्रमणध्वनीवर स्काईप अॅप घेण्यास भाग पाडले. या अॅपद्बारे बँक खात्याची माहिती मिळवली.
यानंतर अज्ञाताने अंधेरी पोलीस ठाणे व मुंबई सीआयडीकडून चौकशी केली जाईल असे सांगत सीआयडीच्या नावाने बँक खात्यावरील काही रक्कम पंजाब नॅशनल व इंडिसंड बँकेच्या खात्यावर वर्ग करून घेतले. तर काही रक्कम आरटीजीएस करण्यास भाग पाडले. अर्ध्या तासात पडताळणी करून पैसे परत करण्यात येतील असे सांगून १९ लाख ७ हजार रूपयांचा गंडा घातला आहे.