सांगली : दिवसभर अंगाची लाही लाही करणार्‍या तीव्र उष्म्यानंतर सायंकाळी मिरजेत हलका पाउस झाला असला तरी ताशी २७ किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वादळी वार्‍यामुळे झाडांच्या फांद्या, विजेचे खांब मोडून पडण्याचे प्रकार घडले. यामुळे सांगली-मिरज वाहतूक महात्मा गांधी चौकापर्यंत विस्कळीत झाली.

आज दिवसभर तपमान ३८ अंश सेल्सियस होते. वाढत्या उष्म्यानंतर सायंकाळी विजेचा कडकडाट सुरू झाला. यातच पश्‍चिम दिशेने पूर्वकडे वेगवान वारे वाहत होते. सायंकाळी या वार्‍याचा वेग २७.४ किलोमीटर प्रतितास होता. या वार्‍यामुळे सांगली मिरज मार्गावरील वंटमुरे कॉर्नर येथे एका खोययावर झाडाची फांदी तुटून पडली. यामुळे खोके जवळच लावण्यात आलेल्या दुचाकीवर पडले. यामुळे खोक्याबरोबरच तीन दुचाकींचेही नुकसान झाले. तसेच याच परिसरात असलेल्या आरवटगी पेट्रोल पंपाजवळ विजेचा पोल जोरदार वार्‍याने मध्यातून वाकला. यामुळे मिरज शहरातील अनेक भागात वीज पुरवठा सायंकाळी सहा वाजलेपासून खंडित झाला आहे.

मात्र, सांगलीतील भारती हॉस्पिटल ते महात्मा गांधी चौक या भागात मध्यम स्वरूपाचा पाउस झाला, तर मिरज मार्केट परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या सुमारास जोरदार वादळ झाल्याने रस्त्यावर धुळीचे लोट निर्माण झाले होते. यामुळे दुचाकी चालकांची तारांबळ उडाली. तर शाळा सुटण्याच्या दरम्यान पावसाची हलकी सर आल्याने शाळकरी मुलांचीही तारांबळ उडाली.

दिवसभर आज तीव्र उष्मा जाणवत होता. ढगाळ हवामान असले तरी हवेतील आर्द्रता ४५ टक्क्याहून अधिक होती. सायंकाळी पाचपर्यंत तपमान वाढलेले असतानाच सायंकाळी पावसाची सर आल्यानंतर तपमानात ७ सेल्सियसने कमी होउन सायंकाळी ३१ अंशापर्यंत खाली आले होते. दरम्यान, सोमवारी रात्री आष्टा, भिलवडी, चोपडेवाडी, औदुंबर, अंकलखोप परिसरात मध्यम स्वरूपाचा पाउस झाला. तर मिरज पूर्व भागासह जत तालुक्यात खंडित स्वरूपाचा पाउस झाला.